पावसाचे दिवस आहेत . या काळात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात . सर्पदंश कसा ओळखावा आणि त्यावर तातडीचे उपाय काय आहेत याबाबत या लेखात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .
2. मण्यार common krait (Bungarus caeruleus)
• सर्पदंशाच्या खुणाः विषारी सापामध्ये दोन मोठे व आतील बाजूस वळलेले विषदंत असतात आणि जबड्यातील इतर दात लहान असतात . ज्या वेळी विषारी साप चावा घेतो , तेव्हा त्याच्या दातांच्या खुणा . . अशा ठळकपणे उमटतात , विषदंतांचे दोन मोठे खोल व्रण ठळकपणे दिसतात . परंतु ज्या वेळी बिनविषारी साप चावतो , त्यावेळी त्याच्या दातांच्या बारीक दातांच्या खुणा उमटलेल्या दिसतात . काही वेळा अशा खुणा अस्पष्ट उमटतात.
• सापाच्या विषाचे दोन प्रकार :
१. न्यूरोटॉक्सिक ( तंत्रिका विषाक्त ) : या विषाचा परिणाम तंत्रिका तंत्रावर होतो . नाग व मण्यार सापातील विष या प्रकारचे असते .
२ .हीमोटॉक्सिक ( रक्तविषाक्त ) : या विषाचा परिणाम रक्ताभिसरण तंत्रावर होतो . या विषाने रक्तातील तांबड्या ( रक्तरुधिर ) कोशिका व लहान रक्तवाहिन्या यांचा नाश होतो . फुरशाचे व घोणसाचे विष
हीमोटॉक्सिक असते . हे विष अम्लधर्मी असून ते वाळविल्यास त्यापासून सुईसारखे स्फटिक तयार होतात . नागाच्या विषामध्ये
न्यूरोटॉक्सिन व फुरशाच्या विषामध्ये
हेमोलायसिन हे प्रथिन आढळते . सर्प विषामध्ये विविध प्रकारची एंझाइम ,
फॉस्फोलायपेज - ए ,
कोलिनएस्टरेज , ऑफिओ अमिनो ऑक्सिडेज , न्यूक्लिएज , हायड्रोनायडेज , पायरोफॉस्फेटेज इ . घटक आढळतात .
• प्राणघातक विषाचे प्रमाण : एका व्यक्तीला प्राणघातक ठरू शकणाऱ्या विषाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे .
1. नाग १२ मिग्रॅ.
2. घोणस १५ मिग्रॅ.
3.मण्यार ६ मिग्रॅ.
4. फुरसे ८ मिग्रॅ.
• विषबाधेची लक्षणे
सर्पदंशामध्ये पायावरील दंशाचे प्रमाण अधिक असून हातावर दंशाचे प्रमाण कमी आहे . पायाकडून मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीवर दंश झाला व पुरेसे विष शरीरात गेले तर व्यक्ती २-३ मिनिटांत मरण पावते . फुरशाचे विष रक्ताभिसरण तंबात मिसळले , तर ती व्यक्ती चटकन मरण पावते . बिनविषारी सापाच्या चाव्यामुळे मानसिक धक्का व ताण यांमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो . विषारी सापाला घाईगडबडीमुळे वा चावा घेताना अंदाज चुकल्याने पुरेसे विष टोचणे शक्य होत नाही . व्यक्तीला विषबाधा झाल्यास पुढील लक्षणे दिसतात.
नाग :
१ ) दंशाच्या जागी सहा ते आठ मिनिटांत तांबूस पुरळ दिसू लागते आणि त्या जागी खाज सुटते व वेदनांची जळजळ सुरु होते .
२ ) सुमारे २५ मिनिटांनी रोग्यास झोप आल्यासारखे वाटते ; गुंगी येऊ लागते ; हालचाल करण्याची अगर चालण्याची इच्छा राहत नाही .
३ ) दंशानंतर ३५-५० मिनिटांनी तोंडातून लाळ बाहेर पडते ; ओकाऱ्या सुरू होतात ; शरीर जड होते ; जीभ व घसा सुजतो , त्यामुळे बोलता येत नाही व अन्न खाता येत नाही .
४ ) सुमारे दोन तासांनी अर्धागवायूची बाधा होते ; श्वसनक्रिया मंद होत जाते ; हृदयाचे ठोके जलद पडू लागतात . रुग्ण शुध्दीवर असला , तरी तो बोलू शकत नाही ,
५ ) श्वसनक्रिया आकडी येऊन थांबते व त्यापाठोपाठ हृदयक्रिया बंद पडते .
मण्यार :
१ ) दंशाच्या जागी तांबूस पुरळ उमटते ; परंतु त्या जागी सूज किंवा जळजळणाऱ्या वेदना होत नाहीत .
२ ) आकडीचे झटके सौम्य असतात ; सुस्ती व गुंगी तीव्र स्वरूपाची असते .
३ ) रुग्णाच्या मूत्रामध्ये पांढरी खर ( श्वतक ) सापडते .
४ ) सुमारे सहा तासानंतर पोटात व सांध्यांना अतिशय वेदना होतात .
घोणस व फुरसे :
१ ) दंशाच्या जागी सुमारे आठ मिनिटांत तीव्र वेदना व जळजळ जाणवू लागते . दंशाभोवतालची जागा सुजून लाल व दुखरी होते
२ ) सुमारे पंधरा मिनिटांच्या आत सूज वाटू लागते ; जखमेतून रक्त व दूषित स्राव वाहू लागतो .
३ ) तीव्र वेदना सुरू होतात ; अंगावर काटा उभा राहतो ; ओकाऱ्या होतात ; घाम सुटतो ; डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारल्या जातात व त्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत .
४ ) एक ते दोन तासांत रुग्णाची शुध्द हरपते .
५ ) जखमेतून पुरेसे रक्त वाहून गेल्यावर जखमेच्या जागी सूज येते ; ती जवळच्या भागात पसरते ; जखमेच्या जागी पू होतो व त्वचा कुजू लागते .
६ ) आतड्यातून व दातांच्या हिरड्यांतून रक्त वाहू लागते ,
• प्रथमोपचार
सर्पदंश झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरी सल्ल्याने केलेले उपचार . दंश झाल्यानंतर असे उपचार तत्काळ शक्य होतातच असे नाही . अशा वेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोपचार महत्त्वाचे असतात . दंशाच्या ठिकाणी काप घेऊन तेथील रक्त वाहू देण्याची पद्धत पूर्वी रूढ होती . त्यामागे दंशाच्या ठिकाणचे विष रक्ताबरोबर वाहून जाते असा समज होता . परंतु तसे करू नये . मुख्य म्हणजे काप घेणे ही बाब रुग्णासाठी वेदनादायक असते . काप घेतल्यावर प्रत्यक्षात अत्यल्प विष वाहून जाते आणि रक्त वाहून गेल्यामुळे त्या माणसाचे नुकसानच जास्त होते . कित्येकदा साप बिनविषारी असतात किंवा विषारी सापाचे विष चाव्याच्या वेळी टोचले गेले नसण्याचीही शक्यता असते .
सर्पदंश झाल्यावर पुढील गोष्टी कराव्यात :
१. जखम स्वच्छ धुवावी .
२. चित्रात दाखवल्याप्रमाणे रुंद क्रेप बँडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे . बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत . दंश झालेला भाग स्थिर ठेवावा . त्यासाठी बँडेज बांधताना फळीचा आधार द्यावा . डॉक्टरांकडे पोचेपर्यंत हे बँडेज काढू नये . घोणस किंवा फुरसे चावले असेल तर मात्र बँडेज बांधू नये .
३. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते . त्यास धीर द्यावा व उबदार ठेवावे पण त्यासाठी अल्कोहोल पाजू नये . चालणे , बोलणे असे कोणतेही श्रम करू न देता त्यास शांत राहण्यास सांगावे .
४. डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास प्रथम सांगावे . ५. चावलेला साप मारून डॉक्टरांकडे नेऊ नये .
Nice important information
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice.....informational content....hope you share much more interesting facts in future too....... all the best for future....☺
ReplyDeleteReally nice sagar and best luck for future...🎀
ReplyDelete