दयाळ

इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली 
सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन) 
आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन) 
शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस) 
लांबी : २३ सें.मी. 
आकार : बुलबुलापेक्षा मोठा 



          सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्थायिक पक्षी आहे. मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलेला हा पक्षी रानावनातही राहतो. हा बांगलादेशचा राष्ट्रपक्षी (National Bird) आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे मार्च ते जून या काळात दयाळाची वीण होते. नर स्वतःचा वीणमुलूख (Breeding Territory) स्थापन करतो. काही इमारती आणि त्यांच्या सभोवतालचा झाडोरा हा एखाद्या वीणमुलखाचा सर्वसाधारण आकार असू शकतो. एखाद्या वीणमुलखाचा आकार हा मुख्यतः झाडाझुडपांची संख्या, घरटं करण्यासाठी उपयुक्त जागा, घरट्याच्या साहित्याची आणि अन्नाची उपलब्धता या गोष्टींवर अवलंबून असतो. अशा वीणमुलखाची स्थापना करणारा नर त्याचं नेटाने संरक्षण करतो. त्याला स्वतःच्या राज्यात जरा कुठे दुसऱ्या नराची चाहूल लागली की, तो खाणंपिणं सोडून तातडीने दुसऱ्या, घुसखोरी करणाऱ्या नराला हाकलण्याची मोहीम उघडतो. घुसखोराचा त्वेषाने पाठलाग केला जातो. मग दोन्ही नर परस्परांना आव्हान देत नृत्य करतात. अशा वेळी काळ्या - पांढऱ्या पिसांचं सौंदर्य खुलवून दाखवताना शेपटीचा पंखा फुलवून पक्षी ताठरतात. जमिनीवर उतरून मंद पदन्यास करतात. 



          नाजूक चिवचिवाट करतात. मधाळ अशा स्वरांच्या लडींची मुक्त उधळण करतात. यात कमी पडणारा नर स्वतःहून माघार घेतो.क्वचित प्रसंगी झोंबाझोंबीही होते. दोघे हमरीतुमरीवर येतात. त्या परिसराचा मूळ मालक घुसखोरी करणाऱ्या पक्ष्याला त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत हाकलून माघारी येतो  दोन वेगवेगळ्या नरांचे वीणमुलूख शेजारी शेजारी असू शकतात. आपापल्या वीणमुलखातील सर्वांत उंच जागेवर बसून दोन्ही नर गाणं गातात, गाणं छोट्या छोट्या पदांनी बनलेलं असतं. नीट कान देऊन ऐकलं तर कळतं की विशिष्ट पद (किंवा स्वरावली) पुन्हा पुन्हा आळवलं जातं. हा पक्षी त्याच्या गाण्यामध्ये इतर पक्ष्यांच्या आवाजांची गुंफण करतो. सुभग पक्ष्याच्या विशिष्ट शिट्टीची लाजवाब नक्कल करणारा दयाळ मी ऐकला आहे. स्वतः एक मीलनोत्सुक नर असल्याची जाहिरात करणं , वीणमुलखाची घोषणा करून त्यावर हक्क सांगणं , मादीला आकर्षित करणं , प्रतिस्पर्धी नराला दूर ठेवणं आणि पिल्लांवर आपल्या जातीच्या गाण्याचे संस्कार करणं अशा वेगवेगळ्या उद्देशांनी गाणं गायलं जातं. जवळपासचे दोन नर एकाच वेळी गात असतील तर त्यांचं गाणं अधिक जोशपूर्ण होतं, अधिक बहरतं असं लक्षात आलं आहे. दयाळ पक्ष्याचे दोन - तीन आवाज नेहमी ऐकू येतात. पूर्ण वाढ झालेले पक्षी बहुधा परस्परांशी संपर्क ठेवण्यासाठी 'सीईक्! 'अशी जरा लांबवलेली शीळ घालतात. ' सीईक् चक् - चक् - चक् - चक् ! ' हा आवाज सर्वसाधारणपणे पूर्णपणे नवख्या गोष्टीबद्दल एकमेकांना सूचित करण्यासाठी काढला जातो. या स्वच्छ, खणखणीत आवाजावरून एकमेकांना आपली नेमकी जागा कोणती हेसुद्धा सांगितलं जातं. सूर्यास्तानंतर अगदी अंधार पडायच्या बेतालासुद्धा दयाळ व्यवस्थित जागा असतो. अशा वेळी ' चर्ररं ! ' किंवा ' चशऽऽऽ ! ' हा काहीसा घोगरा, कर्कश आवाज काढून त्याची झोपायची वेळ झाली असल्याचं सूचित करतो. कधी कधी बागेच्या कोपऱ्यात चोरपावलांनी मांजर हिंडताना दिसली, तर काढला जाणारा, धोक्याची सूचना देणारा आवाज (Alarm Call) किंचित मोठा, ' चर ! ' असा असतो. मनुष्यवस्तीच्या आसपास राहणारे दयाळ एखाद्या जुनाट भिंतीतल्या भोकात, नारळाच्या झाडावर जिथे झावळी फुटते तिथल्या बेचक्यात, पाणी वाहून जाण्यासाठी लावलेल्या पाइपमध्ये, झाडाच्या खोडाला किंवा फांदीला असलेल्या भोकात, सोडून दिलेल्या पत्रपेटीत किंवा मुद्दाम लावलेल्या घरकुलात (Nest Box) घरटं करतात. रानावनातले दयाळ मुख्यतः झाडांच्या ढोल्यांमध्ये जागा मिळवतात. खेड्यापाड्यातल्या दयाळाला अनेक पर्याय असतात. तुटलेल्या झाडाच्या खुंटाच्या पोकळीत किंवा चालू विहिरीतल्या दोनचिऱ्यांमधल्या सापटीत तो आपला संसार थाटतो. घरट्यासाटी गवत, मुळ्या, केस, लहान काड्या, पानं, कापूस, चिंध्या, दोऱ्या, सुतळीचे तुकडे असं साहित्य गोळा केलं जातं. घरट्यात मादी ३ ते ५ अंडी घालते. मादी अंडी उबवण्याचं काम करते. नर इतर जबाबदाऱ्या घेतो. अंडी फोडून पिल्लं बाहेर आली की घरट्याच्या नजीकचा परिसर हे क्षेत्र त्याच्यासाठी अत्यंत संवेदनशील बनतं. कावळा किंवा भारद्वाजासारखे पक्षी दयाळाच्या जोड्याने आखून घेतलेली लक्ष्मणरेषा ओलांडून आत आले की, जोरदार पाठलाग करून त्यांना हाकलून दिलं जातं. दिवसागणिक वाढणारी, सतत भुकेली पिल्लं ' चिरैरै ! चिरं ! ' असा नाजूक, हलकासा आवाज काढतात. नर किंवा मादी जवळ आली की खाद्याची मागणी करणारा हा आवाज अचानक मोठा होतो. या पक्ष्याच्या बाबतीत घरटं करून पिल्लं वाढवण्याचा आणि नैऋत्य मोसमी पावसाचा काहीही संबंध नसतो. खूप कमी पाऊस झाला तरी पक्षी यशस्वीरीत्या चार - चार पिल्लाचं पालनपोषण करू शकतो. हा पक्षी मिश्राहारी असून पळस, पांगारा, काटेसावर यांच्या फुलांमधल्या मधुरसाबरोबर तो अनेक प्रकारचे किडे आणि लहानसहान सरीसृपांची शिकारही करतो. त्याच्या भक्ष्ययादीत मुंग्या, पतंग, नाकतोडे, टोळ, गवळण, अळ्या, गोगलगायी, गांडुळं, झुरळ, घोण ,गोमा, पाली, लहान सरडे यांचा समावेश होतो. शेताच्या बांधावर, जनावरांच्या गोठ्याजवळ, नदीकाठच्या हिरवळीवर  परसबागेतल्या जमिनीवर किंवा फळबागेतल्या पाण्याच्या पाटावरभक्ष्याचा शोध घेणारा दयाळ दोन पद्धती वापरतो. पहिली म्हणजे सरळ जमिनीवर उतरून उड्या मारत मारत वाटेत दिसेल ते भक्ष्य टिपायचं आणि दुसरी म्हणजे एखाद्या झाडाच्या फांदीवर किंवा कुंपणाच्या खांबावर मोक्याच्या जागी बसून बारकाईने निरीक्षण करत बसायचं आणि काही हालचाल दिसली की तिथून भक्ष्यावर उडी मारायची. कधी कधी स्वतः दयाळावरही भक्ष्य होण्याची वेळ येते.  पाळीव मांजरीदेखील दयाळाची घरटं सोडून नुकतीच उडायला लागलेली पिल्लं पकडतात. कारण पुष्कळदा जमिनीवर उतरून भक्ष्य गोळा करणारे नर - मादी पिल्लांना जमिनीवर भरवतात. अशा वेळी झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या मांजरी बरोबर डाव साधतात. दयाळ या पक्ष्याची गणना सतत काही ना काही हालचाल करणाऱ्या, तुडतुड्या पक्ष्यांमध्ये करता येणार नाही. हा पक्षी तसा कायम निवांत असतो. त्यामुळे फोटोग्राफरला भरपूर पोझेस वगैरे देतो. जलकुंडात, खापराच्या तुकड्यात किंवा मातीच्या पसरट भांड्यात ठेवलेल्या पाण्यावर तो येतो. पाणी पितो आणि आत उतरून अंघोळ करतो. या साध्या दिसणाऱ्या पक्ष्याचे अंघोळ करतानाचे फोटो छान येतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)