कबुतर
इतर मराठी नावं : पारवा, पारवळ
सध्याचं इंग्रजी नाव :
Common Pigeon (कामन
आधीचं इंग्रजी नाव : Rock Pigeon (रॉक पिजन)
शास्त्रीय नाव : Columba livia (कोलंबा लिविया)
लांबी : ३३ सें.मी.
आकार :
कावळ्यापेक्षा लहान
 |
(Columba Livia) image © Wikipedia |
'गुटर-गू, गुटर-गूं!' असा घुमणारा आवाज करणारा हा पक्षी चिमणीसारखाच माणसाचा सख्खा शेजारी आहे. खेड्यापाड्यात दिसणारी कबुतराची अतिपरिचित आकृती निर्जन कड्याकपारींमध्येही दिसते. मध्यम वस्तीच्या गावांपासून दाट लोकवस्तीच्या शहरांपर्यंत कबुतर भक्कम उभं आहे. या पक्ष्याचं वैशिष्ट्यच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची त्याची पद्धत. नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांना नर-मादी स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पातळ स्राव भरवतात. या स्रावाला 'कबुतराचं दूध' (Pigeon Milk) असं म्हणतात. कबुतराची लहान पिल्लं आपल्या चोची त्यांच्या पालकांच्या चोचीमध्ये घालून खाद्य
घेतात. अशा वेळी भरवणारा पक्षी त्याच्या पोटाची गदगदवल्यासारखी हालचाल करून त्याच्या अन्नसंचयीतून लाळयुक्त धान्य पुन्हा चोचीत आणून पिल्लांना भरवतो. या कृतीला उगिलन' (Regurgitation) असं म्हणतात. कबुतरं पाळणारे याला 'गुळणी करणे' असं म्हणतात. पालक पक्ष्यांनी अर्धवट पचवलेली गुळणी पिल्लांना पचवायला सोपी जाते.
हा पूर्णपणे शाकाहारी पक्षी आहे. काही कबुतरं शहरवस्त्यांमध्ये रातथाऱ्याला (निवाऱ्याला) येतात तर खेड्यापाड्यांमध्ये चाऱ्याला जातात. आधुनिक वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या इमारतींमध्येदेखील जिथे जागा मिळेल तिथे घुसणं कबुतरांना जमलं आहे. चार- पाच काड्या गोळा केल्या की त्याचं उघड्यावरचं घरटं तयार होतं. त्यात मादी दोन पांढरी शुभ्र अंडी घालते. घरटं केव्हा करायचं या बाबतीत कोणताही नियम नसलेलं कबूतर आपला उघड्यावरचा संसार सांभाळताना अत्यंत मवाळ भूमिका घेतं. प्रतिकार म्हणजे काय हे या
पक्ष्याला माहीत नाही. घरट्यावर जर कावळा आला, तर नर-मादीदेखत अंडी फोडून खाऊन टाकतो किंवा पळवून नेतो.
भूतदयेच्या नावाखाली कबुतरांच्या दाणापाण्याची सोय झाली तशी त्यांची संख्या भरमसाट वाढली. शहर भागात ही कबुतरं म्हणजे आता डोकेदुखी झाली आहे. कावळा आणि मांजर हे दोन किरकोळ भक्षक सोडले तर कबुतरांची संख्या काबूत ठेवणारा एकही
तिसरा भक्षक नाही. कधी कधी एखादा बहिरी ससाणा कबुतराची शिकार करतो. कबुतरांची झंडशाही बंद करायची असेल तर त्यांच्या सेनेची रसद तोडणं म्हणजेच त्यांना खायला घालणं बंद करणं हाच एकमेव उपाय आहे. पण धार्मिक भावना दुखावणारा मुद्दा असल्यामुळे हे कोणीही करणार नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती बदलण्याची कोणतीही चिन्हं नाहीत.
Comments
Post a Comment