इतर मराठी नावं : कावळा , सोमकावळा , घरकावळा
इंग्रजी नाव : House Crow ( हाउस क्रो )
शास्त्रीय नाव :
Corvus splendens (कॉरव्हस स्प्लेंडेन्स)
लांबी : ४० सें . मी .
आकार :
कबुतरापेक्षा मोठा
 |
(Corvus splendens) photo © wikipedia |
कावळा हा पक्षी माहीत नाही असा माणूस असणं शक्य नाही . ज्या गावांमध्ये जास्तीत जास्त उकिरडे , घाण असते अशा गावांमध्ये कावळ्यांना भरपूर वाव असतो . असा क्वचितच एखादा पदार्थ असेल जो हा उभयाहारी पक्षी खात नाही . पाव , बिस्किटं , फळं , मांस , मच्छी । दुसऱ्या पक्ष्यांची अंडी , पिल्लं , उष्टं - खरकटं . . . पक्ष्यांच्या जगातला हा आघाडीचा सफाई । कामगार . हा जसा रस्त्यावर मरून पडलेल्या घुशीचा कोथळा बाहेर काढतो तसाच । तेराव्याच्या पिंडाचा भातही हाणतो !
गावकावळ्याचा एक भाऊ म्हणजे डोमकावळा किंवा जंगल कावळा ( Indian Jungle Crow ) . पण हे जंगल कावळेसुद्धा हल्ली दाट लोकवस्तीत दिसतात . याचं कारण
नष्ट होत चाललेली जंगलं . डोमकावळा पूर्णपणे काळा
कुळकुळीत असतो , तर गावकावळ्याची रंगाची मान राखाडी असते . एखाद्या उकिरड्यावर गावकावळा खाद्य शोधत असताना जर तिथे डोमकावळा टपकला , तर गावकावळा बाजूला होतो .
काड्याकाटक्यांचा छोटासा ढीग म्हणजे कावळ्याचं घरटं . अमुकच झाडावर घरटं करायचं अशी त्याची निवड नसते . वड , पिंपळ , कडुनिंब अशा देशी झाडांबरोबरच निलगिरी , बॉटल पाम , काशिद आणि अगदीच झाडांचा दुष्काळ असेल तर सुबाभळीचं झाडही त्याला चालतं .शहरांमध्ये राहणारे कावळे अक्षरशः जी मिळेल ती वस्तू गोळा करून घरट्यात टाकतात . काचा नसलेली चश्म्याची फ्रेम , लोखंडाच्या तारा , अॅल्युमिनियमचे हँगर , प्लॅस्टिकच्या पट्ट्या , रिबिनी , काथ्या , दोऱ्या . . . कावळ्यांचं हे अजब घरटं एप्रिल ते जून या काळात आकारतं . एक गावकावळा चोचीत पुरी घेऊन उडत चालला होता . तो एका घराच्या गच्चीला असलेल्या पाणी वाहून जाण्याच्या पाइपवर बसला . मग टुणुक टुणुक उड्या मारत पाइपच्या तोंडावर आला . खाली वाकला आणि चोचीतली पुरी पाइपमध्ये ठेवून पसार झाला . मी नोंदवहीत नोंद केली . ' जेव्हा खायचं नसतं तेव्हा आपलं खाद्य लपवून ठेवायचं आणि ते लक्षात ठेवून पुन्हा गरज पडेल तेव्हा तिथे जाऊन खायचं , ही अक्कल कावळ्याला असते ! ' ५ मे २०११ रोजी मावळ तालुक्यातील चाले या गावात सकाळी ८ . ३० वाजता आम्ही कावळ्यांचं मीलन पाहिलं . दोन घरांच्या मधल्या भागात असलेल्या मोकळ्या जागेत दोन कावळे जमिनीवर उतरून काहीतरी शोधाशोध करत होते . तेवढ्यात एका कावळ्याला काहीतरी खाद्य सापडलं . पण त्याने ते स्वतःच न खाता तो दुसऱ्या कावळ्याच्या जवळ गेला . नर आपल्यासाठी खायला घेऊन आला आहे हे कळल्यावर मादीने जमिनीवर किंचित दबून पंख अर्धवट उघडून फडफड करत पिल्लू असल्यासारखी घासाची मागणी केली . नराने मादीला भरवलं . मादी दबली आणि मीलन झालं . त्या वेळी मादीने , वर्णन करता येणार नाही असा फार वेगळा , कर्कश आवाज केला . मोठ्या संख्येने सर्वत्र दिसणाऱ्या कावळ्याचं मीलन मात्र क्वचितच बघायला मिळतं . कावळ्याकडे काय बघायचं म्हणून बऱ्याचदा त्याच्याकडे काणाडोळा केला जातो म्हणून असं होत असावं . कावळ्याचं मीलन पाहू नये ,ते अतिशय वाईट असतं अशा अर्थाचं एक विधान मोल्सवर्थच्या मराठी - इंग्रजी शब्दकोशात ( सुधारित चौथे पुनर्मुद्रण ) आहे - ' काकमैथुन पाहावें साहा महिन्यांत स्मशाणांत जावें ' .अर्थातच हे विधान अशास्त्रीय , चुकीचं आणि लोकांच्या गैरसमजुतींवर आधारित आहे . कावळ्याचं मैथुन बघून अनेक महिने उलटले आहेत , तरीही मी जिवंत आहे !
Comments
Post a Comment