इतर मराठी नावं : शिंगोरा , शिंगचोचा , धनचिडी , धनेरा , भिणस , धनछडी
इंग्रजी नाव : Indian Grey Hornbill ( इंडियन ग्रे हॉर्नबिल )
शास्त्रीय नाव : Ocyceros birostris ( ओसिरॉस बायरॉस्ट्रिस )
लांबी : ६१ सें.मी.
आकार : घारीएवढा .
हा पक्षी त्याच्या धुरकट राखाडी रंगामुळे आणि चोचीच्या विशिष्ट आकारामुळे चटकन ओळखता येतो. त्याच्या चोचीवर शिंगासारखा दिसणारा (Casque) एक अवयव असतो. याची शेपटी लांब असते. हे पक्षी पानझडीच्या जंगलात, शेतांच्या आसपास असलेल्या मोठ्या झाडांवर, फळबागांमध्ये आणि शहरातील वडा-पिंपळासारख्या वृक्षांवर दिसतात. धनेश हा नेहमीच झाडांवर राहणारा पक्षी आहे. झाडांची फळं खाण्याबरोबरच तो किडे, पाली, गांधीलमाश्या, छोटे उंदीरसुद्धा खातो. जोडीने फिरणारे हे पक्षी विणीच्या हंगामात म्हणजे मार्च ते जून या महिन्यात घरटं करण्यासाठी झाडांच्या ढोल्या शोधू लागतात.विणीची वेळ जवळ आली की मादी ढोलीत जाऊन बसते. बाहेरच्या बाजूने नराने आणून दिलेल्या चिखलाचा आणि स्वतःच्या विष्ठेचा उपयोग करून ती ढोलीचं तोंड बंद करते आणि फक्त चोच बाहेर काढता येईल एवढीच फट ठेवते. या कामात चोचीचा उपयोग थापीसारखा केला जातो.
मादीला आणि कालांतराने काही दिवस पिल्लांना भरवण्याची जबाबदारी नरच सांभाळतो. नर इमानेइतबारे दिवस दिवस खपत राहतो. पिल्लांना पिस येईपर्यंत मादीचा बंदिवास चालू राहतो. नंतर ती भिंत फोडून बाहेर येते. पुन्हा घरट्याचं तोंड बंद करून टाकते. हे काम झाल्यानंतर नर आणि मादी मिळून पिल्लांना भरवतात. अशा प्रकारे अंडी आणि पिल्लांचं साप आणि इतर भक्षकांपासून रक्षण होतं. एखाद्या गजबजलेल्या शहरातल्या वाहतुकीच्या गदारोळातही राखी धनेशाचा ' चिळीऽऽ ! चिळ्ळीऽऽ ! ' असा लक्षवेधक, काहीसा कर्कश आवाज कानांवर येतो. या व्यतिरिक्त नर, मादी आणि चालू विणीतली उडायला लागलेली पिल्लं एकत्र आली की किचकिचाटासारखे, चिरकल्यासारखे आवाज ऐकू येतात. 'चिविक्-चिविक्-किलिक्-किलिक्! ' ' क्रि - क्रि - क्रि - क्रि - क्रि ! '( भरभर काढलेला आवाज ) 'किल्लीऽऽऽ! किल्लीऽऽऽ ! किल्लीऽऽऽ ! 'या पक्ष्याच्या दैनंदिन वेळापत्रकाचा अभ्यास केला तर विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला त्याची अपॉइंटमेंट 'घेता येते. तो एका झाडावरून दुसऱ्या झाडाच्या दिशेने अधूनमधून पंखांची उघडझाप करून संथपणे तरंगत जातो. या पक्ष्याच्या सर्व जाती मुख्यतः वनवासी आहेत. त्यांचं जतन करायचं असल्यास जंगलाचं संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जंगलाचं संवर्धन म्हणजे जंगलात झाडं लावणं असा अर्थ नसून ते आहे त्याच अवस्थेत टिकवून ठेवणं असा आहे. जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या झाडांचा प्रसार करण्यात धनेश आघाडीवर असतो. त्याच्या विष्ठेतून खाली पडणाऱ्या फळांच्या बिया रुजतात आणि हळूहळू त्याची झाडं तयार होतात. अशा रीतीने तो जंगलाच्या वाढीस हातभार लावतो. जंगलतोड, वीज कोसळून आग लागणं, वादळवाऱ्यात झाडं पडणं आणि मनुष्यनिर्मित वणवे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जंगलाचा कमी - जास्त प्रमाणात नाश होतो. त्यामुळे एखाद्या जंगलात निर्माण झालेल्या रिकाम्या जागा हरोळी, बुलबुल, साळुक्या, तांबट, कुटुंक आणि धनेशासारखे फळं खाणारे पक्षी भरून काढतात. वड, पिंपळ, उंबर, काजरा अशा अनेक जातींची रानटी झाडं आणि वेली धनेशाच्या माध्यमातून नव्याने उगवतात, वाढतात आणि बहरतात. वृक्षनिवासी धनेश क्वचित जमिनीवरही उतरतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला वाळव्यांच्या जमिनीखालच्या वसाहतीला जाग येते. अशा वेळी एखाद्या वसाहतीच्या प्रवेशमार्गाजवळ वाळव्या खाण्यासाठी पक्ष्यांची झुंबड उडते. त्यांच्यात बेडौल दिसणारा धनेशही असतो. वाळव्यांसारखे छोटे किडे त्याच्या अजस चोचीत पकडताना होणाऱ्या त्याच्या हालचाली बोजड वाटतात. जमिनीवरून दोन - तीन फुटांपर्यंत उसळी घेऊन एखादी वाळवी पकडली, की मानेला दोनदा तीनदा झटके देऊन गिळून टाकली जाते. कधी कधी जंगलातल्या मातीच्या रस्त्यावर उतरून राखी धनेशांचा एखादा थवा धूलिस्नान करताना दिसतो. त्यामुळे पिसांमधल्या उवा, लिखा अशा रक्तपिपासू परजीवींपासून त्यांची सुटका होते. हे दुर्मीळ असं दृश्य बघायला मिळणारा पक्षिनिरीक्षक स्वतःला भाग्यवान समजतो. कोणत्या रानातल्या कोणत्या झाडांना केव्हा फळं धरतात हे धनेशाला अनुभवावरून आणि फळांसाठी अशा झाडांवर गोळा होणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटावरून माहीत होतं. अशा झाडांच्या शोधात तो स्थानिक स्वरूपाचं स्थलांतर ( Local Migration ) करतो . फळांवर ताव मारतो आणि बीजप्रसाराचं कामही करतो .
👍
ReplyDeleteNice..
ReplyDeleteNice..
ReplyDeleteNice Information
ReplyDelete