दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

शिंपी Common Tailorbird (Orthotomus sutorius)

शिंपीइतर मराठी नावं : लिचकूर , चिवळ 
इंग्रजी नाव : Common Tailorbird ( कॉमन टेलरबर्ड ) 
शास्त्रीय नाव : Orthotomus sutorius ( ऑर्थोटोमस सुटोरियस ) 
लांबी : १३ सें.मी. 
आकार : चिमणीपेक्षा लहान 



          सुगरण पक्ष्याच्या खालोखाल नजाकतदार, उत्कृष्ट घरटं बांधणारा वास्तुशिल्पी म्हणजे हा शिंपी पक्षी. हा पक्षी छोट्या चणीचा आणि हिरव्या रंगाचा असतो. त्याच्या डोक्यावर तांबूस तपकिरी रंगाची टोपी असून पोटाकडची बाजू पांढरी असते. किडे पकडण्यासाठी आणि पानांना टाके घालून घरटं शिवण्यासाठी योग्य अशी त्याची चोच अतिशय टोकदार असते. शिंपी पक्षी कमी उंचीच्या झाडाझुडपांमध्ये किडे शोधत हिंडत असतात. या पक्ष्याचं मुख्य अन्न म्हणजे झुरळं, मुंग्या, उडणारे किडे, अळ्या वगैरे. वसंत ऋतूत जेव्हा पांगारा, पळस आणि काटेसावरीसारखे वृक्ष फुलतात तेव्हा फुलांमधला मकरंद पिण्यासाठी याझाडांवर शिंप्याचा फेरा होतो. तेव्हा त्याच्या डोक्याच्या पिसांना परागकण चिकटतात आणि पर्यायाने परागीभवनास मदत होते. शिंपी हा एक धीट पक्षी आहे. शुष्क, पानझडीच्या जंगलातून तसेच खेड्यापाड्यांतून आणि शहरांतूनही हा मोकळेपणाने वावरतो. 

शिंपी पक्षाचे शिवणकाम करून तयार केलेले घरटे 

          हा पक्षी चक्क टाके घालून त्याचं पिशवीसारखं घरटं शिवतो म्हणून त्याला पक्ष्यांमधला शिंपी म्हणतात. विणीच्या हंगामात शेपटीमधून दोन लांबलचक पिसं फुटतात तेव्हा नर शिंपी वेगळा ओळखता येतो. मादी मात्र भुंड्या शेपटीची असते. शिंप्याला लिचकूर असंही नाव आहे . ' च्युव्हिट् च्युव्हिट् च्युव्हिट् च्युव्हिट ! ' असा त्याचा खणखणीत आवाज प्रसिद्ध आहे. पक्ष्याच्या आकाराचा विचार केला, तर त्याचा आवाज खूपच मोठा, लांबवर पोहोचणारा वाटतो. टेपरेकॉर्डरवर मी शिंप्याचे काही आवाज रेकॉर्ड केले. चालू घरट्याजवळ जर अचानक कुणी आलं तर, परस्परांशी संपर्क साधण्यासाठी, मादीला आकर्षित करण्यासाठी, किडे शोधत असताना शिंपी त - हेत - हेचे आवाज काढतो, त्यांचं शब्दांत वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. ' चीयक् - चीयक् - चीयक् - चीयक् - चीयक् - चीयक् ! ' ' च्यव्हिट् - च्यव्हिट् - च्यव्हिट् - च्यव्हिट् - च्यव्हिट् - च्यव्हिट् ! ' ' पिच्या - पिच्या - पिच्या - पिच्या - पिच्या - पिच्या ! ' वीइट् - वीइट् - वीइट् - वीइट - वीइट् - वीइट् । ' ' पेटी - पेटी - पेटी - पेटी - पेटी - पेटी ! ' ' चीयाँव - चीयाँव - चीयाँव - चीयाँव - चीयॉव ! ' विणीच्या हंगामात शिंपी कर्दळ, अबोली, कोरांटी, बदाम, पेरू, पारिजात किंवा अशोक यासारख्या झाडांच्या दोन पानांच्या कडा शिवून उभट आकाराचं घरटं बनवतो. घरटं करण्यासाठी योग्य असं झुडूप एखाद्या घराच्या गॅलरीत जरी सापडलं तरी माणसाचा सख्खा शेजारी असल्यासारखा शिंपी त्याचं घरटं तयार करतो. घरट्यामध्ये काटेसावरीचा किंवा आपण नेहमी वापरतो तो कापूस भरला जातो. अंड्यांवर बसलेला पक्षी घरट्याला असलेल्या भोकातून बाहेरच्या हालचालींवर आणि घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. अनवधानाने जर कोणी घरट्याच्या जास्तच जवळ आलं तर पक्षी घरटं सोडतो आणि जणू काही आपण या गावचे नाहीच अशा थाटात घाईघाईत जमिनीलगत उडत एखाद्या झुडपात नाहीसा होतो. शिंप्याचा नर अंडी उबवायला बसला की त्याची सुप्रसिद्ध शेपूट घरट्याच्या आतल्या बाजूला दाबून ताठ किंवा उभी धरलेली असते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)