दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

जंगल मैना

इंग्रजी नाव : Jungle Myna (जंगल मैना) 
शास्त्रीय नाव : Acridotheres fuscus (अक्रिडोथिरिस फ्युस्कस) 
लांबी : २३ सें.मी. 
आकार : साळुंकीएवढा 

                              

नाव 'जंगल' मैना असलं, तरी हा पक्षी दाट लोकवस्तीतही दिसत. एके काळी मनुष्यवस्तीपासून दूर शेत - शिवारांमध्ये किंवा गायरानांमध्ये चरणाऱ्या जनावरांच्या पायांमधून ठुमकणारी ही मैना आता गजबजलेल्या शहरांच्या परिघात दिसू लागली आहे; घरटी करून आपली प्रजा वाढवू लागली आहे. साळुकीशी (Common Myna) तुलना करता तिची संख्या कमी आहे परंतु शहरी जीवन तिच्या अंगवळणी पडू लागलं आहे. साळुकीच्या पावलावर पाऊल ठेवून ती आता एखाद्या कचरापेटीच्या आसपास उड्या मारताना दिसते. एखाद्या शहरातल्या आधुनिक वसाहतीपेक्षा जुन्या भागाशी, पेठांशी अधिक जवळीक करणाऱ्या मैनेला अशा ठिकाणी घरटी करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होतात. भाताची शेती, जंगलांच्या जवळ असणारी लहान - मोठी गावं, जंगलपट्ट्यांमधील मोकळ्या जागा आणि शहरांच्या पंचक्रोशी या अधिवासात दिसणारा पक्षी एकंदरच घनदाट जंगलात राहणं टाळतो. साळुकीपेक्षा जास्त गडद रंगाची जंगल मैना ओळखायची खूण म्हणजे तिच्या डोळ्यांभोवती पिवळी कातडी नसते  तिच्या चोचीवर, कपाळाच्या सुरुवातीला असलेला पिसांचा झुबका आपलं लक्ष वेधून घेतो. अनेक वनस्पतींच्या फुलांच्या परागीभवनात कळीची भूमिका बजावत असताना झुबक्याचा उपयोग कुंचल्यासारखा होतो. फुलांमधला मधुरस पीत असताना झुबक्याला परागकण चिकटतात आणि वाहून नेले जातात. हा मिश्राहारी पक्षी टणटणी, नेपती, टेंभुर्णी, जोंदुर्ली, वड, पिंपळ आणि नाना प्रकारच्या रानटी फळांबरोबरच वेगवेगळ्या जातीच्या कीटकांवर आपली गुजराण करतो. 
           माणसाचा सख्खा शेजारी हा किताब मिळवलेली साळुकी किंवा शाळू उष्ट्या खरकट्यावरही जगते, तशी जंगल मैना कट्टर सफाईकाराची भूमिका निभावताना दिसत नाही, परंतु बदलत्या परिस्थितीला आणि परिसराला अनुसरून पक्षी आपल्या सवयी बदलतात. सुरक्षित वातावरण, पुरेसं खाद्य, रातथाऱ्याची झाडं, घरट करण्यासाठी आवश्यक सामानसुमान आणि जागांची उपलब्धता या मूलभूत गरजा व्यवस्थित भागवल्या जात असतील तर हळूहळू जंगल मैनेची 'शहरी मैना' होऊ शकेल. या पक्ष्याच्या बाबतीत अशा प्रकारच्या संक्रमणाची सुरुवात तर नक्की झालेली आहे. एरवी छोट्या गावांमधल्या मोकळ्या जागा, भाजीपाल्याचे मळे, कंपोस्ट खताचे खड्डे, नद्यांचे काठ, ऊसशेती आणि विहिरीच्या आजूबाजूला दिसणाऱ्या जंगल मैनेच्या सर्वसाधारण सवयी साळुकीसारख्याच असतात. हा समाजप्रिय पक्षी फेब्रुवारी ते जुलै या काळात घरटं करतो. मुळात सुतार पक्ष्याने पोखरून तयार केलेल्या घरट्याचं भोक, जुन्या भिंतीला पडलेल्या फटी आणि सापट्या, चाळींच्या पत्र्यांच्या खालच्या पोकळ जागा, झाडाच्या ढोल्या, मातीच्या दरडीमध्ये किंवा धशीमध्ये असलेल्या भोकांमध्ये घरटं केलं जातं. टेकड्या पोखरून किंवा टेकड्यांच्या पायथ्याशी बांधलेल्या मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये टेकड्यांवरची दगडमाती घसरून आत येऊ नये आणि पावसाच्या पाण्याला अटकाव व्हावा म्हणून सिमेंट - काँक्रीटच्या जाड भिंती बांधल्या जातात. अशा भिंतींमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भोकं ( Weep Holes ) ठेवलेली असतात. या भोकांमध्ये घरटं करण्यासाठी जंगल मैना चिमण्या - साठ्क्यांशी भांडतानाही बघायला मिळते. ( बऱ्याचदा अशा वेळी साळुकी तिच्यावर कुरघोडी करते.) घरट्यासाठी निवडलेल्या जागेत काड्याकुड्या, मुळे, गवत आणि गदळ भरलं जात . मादी अशा घरट्यात सुंदर हिरव्या - निळ्या रंगाची, इतर कोणत्याही खाणाखुणा नसलेली, सुमारे ४ ते ६ चकचकीत अंडी घालते. अंडी उबवण्यापासून पिल्लाचं भरणपोषण करण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये बाह्यरूपावरून एकसारखे दिसणारे नर - मादी भाग घेतात. घरट्याच्या जवळपास समजा धामण आली , तर तिच्या हालचालीप्रमाणे सतत जागा बदलत, वाकून वाकून बघत, अस्वस्थ झालेली मैना ' कँव - कव - चँव - चैव ! ' असा कर्कश आवाज काढते. एखाद्या जुनाट आंब्याच्या किंवा चिंचेच्या ढोलीवर हक्क बजावताना तिचं एखाद्या दयाळाशी बिनसतं. साधारण जुलै महिन्यात मैनेची पिल्लं घरट्याचं सुरक्षाकवच सोडून बाहेरच्या जगात येतात. तोपर्यंत पडलेल्या पावसामुळे झाडंझुडपं बाळसं धरतात. कीटकांच्या फौजांची ताजी कुमक जन्माला येते. त्यामुळे मैनेच्या पिल्लांना पुरेसं अन्न उपलब्ध होतं. एकंदरच जंगल मैना हा एक आवर्जून अभ्यासावा असा पक्षी आहे. तो माणसाशी कसं जुळवून घेतो, कोणते अधिवास कसे वापरतो, त्याची संख्या कमी - जास्त होते क , त्याची वीण कितपत यशस्वी होते, त्याचे भक्षक कोण आहेत या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)