दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

भांगपाडी मैना

इतर मराठी नावं : ब्राह्मणी मैना , पोपई मैना , काळ्या डोक्याची मैना , काळटोप मैना , शंकरा , कवरी. 
सध्याचं इंग्रजी नाव : Brahminy Starling ( ब्रहमिनी स्टार्लिंग )  
शास्त्रीय नाव : Sturnus pagodarum ( स्टर्नस पॅगोडॅरम ) 
लांबी : २१ सें.मी. 
आकार :साळुंकीपेक्षा लहान 


          
          चापूनचोपून भांग पाडावा तशी डोक्यापासून मानेपर्यंत रूळणारी काळ्या रंगाची सैलसर पिसं असलेली ही मैना, जंगल मैना आणि साळुंकी या सहजपणे दिसणाऱ्या मैनांपेक्षा आकाराने लहान आहे. पानझडीचं विरळ जंगल, झुडपी रान, काटवन, शेतं, बागा, उद्यानं, आमराया, नद्या आणि तलावांच्या काठांवरचे हिरवळीचे तुकडे, गायरानं अशा ठिकाणी ही मैना तिच्या विशिष्ट तोऱ्यात चालताना, फिरताना दिसते . साळुंकीप्रमाणे हा पक्षी मोठ्याथव्यांनी दिसत नाही . तो पुष्कळदा जोडीने किंवा छोट्या गटांमध्ये दिसतो . या पक्ष्याची एक सवय आहे . जमिनीवर उतरून खाद्य शोधता शोधता पक्षी जर मध्येच थांबले, तर मादी नराच्या किंचित जवळ जाते. लगट करणाऱ्या मादीला बघून नर अंगावरची पिसं फुलवतो. एरवी चप्प बसलेली डोक्यावरची पिसं सैलसर असतात आणि ती तुऱ्यासारखी उभारली जातात, हे अशा वेळी लक्षात येतं. या वैशिष्ट्यपूर्ण अशा वागणुकीमधून नर आणि मादीमधील नातं अधिक घट्ट होत असावं. या पक्ष्यात नराशी तुलना करता मादीचा तुरा आखूड असतो.                            गावकुसाबाहेर चरणाऱ्या जनावरांच्या पायांमधून भक्ष्याचा तपास करत फिरणारी ही मैना कबर, पळस, काटेसावर, पाचुंदा, रानपांगारी अशा झाडांच्या फुलांमधला मधुरसही चाखते. तिच्या आहारात मोहाच्या टपोऱ्या रसदार फुलांचाही समावेश असतो. उन्हाळ्यात टेंभरं पिकली, की टकाचोर पक्षी चोच मारून सुरुवात करतात. मग एखाद्या अर्धवट खाल्लेल्या फळावर भांगपाडी येते आणि आपला वाटा उचलते. हा उभयाहारी पक्षी फुलांमधील मकरंद, वाळक्या, फुलं, फळं, मुंग्या, नाकतोडे, पतंग, अळ्या आणि इतर अनेक जातींचे किडे यावर गुजराण करतो. वांग्याच्या, मिरचीच्या शेतातली कीड खाऊन तो शेतकऱ्याला मदत करतो. मध्यंतरी अशाच एका काटेवांग्यांच्या वावरात तीन मैना मेलेल्या सापडल्या. नंतर कळलं की शेतकऱ्याने औषधाची फवारणी केली होती. अत्यंत जहाल अशा रसायनामध्ये माखलेले किडे खाल्ल्यामुळे बिचाऱ्या भांगपाडी मैनांचा जीव गेला.                               साळुकीप्रमाणे भांगपाडी मैनासुद्धा एक गप्पिष्ट पक्षी आहे. तो करकरणारे, चिवचिवाटासारखे, कचकचाटासारखे असे त - हेत - हेचे आवाज काढतो. विणीच्या हंगामात नर आवाज काढण्यासाठी बैठक जमवतो. लकेरी आणि शिट्ट्यांनी बनलेलं गाणं गातो. ' विट्रॅचिट्यव ! ' हा मैनेचा एक नेहमी ऐकू येणारा आवाज आहे. एखाद्या शांत, दुपारच्या वेळी झाडावर बसून स्वगत म्हटल्यासारखे आवाज एका पाठोपाठ एक काढले जातात. ही मैना बुलबुल, कोतवाल या पक्ष्यांच्या आवाजांच्या नकलाही करते. अशा नकला स्वतःच्या नेहमीच्या आवाजांमध्ये मिसळल्या जातात. पण नीट कान दिला तर नकला आणि पक्ष्याचे स्वतःचे आवाज यांच्यातला फरक ओळखू येतो. मे ते जुलै या काळात भांगपाडी मैना घरटं करते. झाडांमधल्या आणि घरांमधल्या सापट्या, फटी, भोकांमध्ये घरट्यासाठी जागा शोधली जाते. शहर - नगरांमधल्या घरट्यांच्या जागा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. घरांच्या भिंतींमधल्या विटा निघाल्यामुळे तयार झालेली भोकं, दगडी पुलांच्या चिऱ्यांमधल्या फटी, नावाच्या पाट्यांच्या मागच्या फटी, बरेच दिवस वापरात नसलेल्या घरगुती पत्रपेट्या, बाल्कन्यांमधलं पाणी वाहूनजाण्यासाठी लावलेले पण वापरात नसलेले पाइप, पत्र्याच्या खालच्या पन्हाळी ... ग्रामीण भागांमध्ये घरट्यांसाठी जागा मिळवणं त्यामानाने सोपं जात असावं. विहिरीमधल्या चिऱ्यांमध्ये, पत्र्यांच्या खाली, थोडी पडझड झालेल्या घरांच्या भिंतींमधल्या भोकांमध्ये तर एवढी जागा असते, की एकाच वेळी दोन जोड्यासुद्धा थोड्याफार अंतरावर घरटी करताना दिसतात. कधी कधी घरटी करण्यासाठी उपयुक्त जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर जंगल मैना, साळुकी आणि भांगपाडी मैना यांची घरटी एकाच भागात जवळजवळ केलेली आढळतात. अशा ' मैना हाउसिंग सोसायटीला ' जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेट दिली, तर पिल्लं वाढवणाऱ्या पक्ष्यांची लगबग बघता येते. घरट्यासाठी निवडलेल्या जागेत गवत, सुकलेली पानं, पिसं, चिंधोट्या कोंबून घरट्याचा तळ तयार केला जातो. शहरातल्या मैना प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे तुकडे, आंब्याच्या मोसमात टाकून दिलेला पेंढा, सुतळी इत्यादी वापरताना आढळतात. घरट्यात मादी ३ किंवा ४ अंडी घालते. सुंदर, फिक्कट निळ्या रंगाच्या अंड्यांवर इतर कोणत्याही खुणा नसतात. नर आणि मादी मिळून घरट्यासंबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतात. जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात फिक्या रंगाचे पिसारे असलेली पिल्लं त्यांच्या पालकांबरोबर जमिनीवरची पहिली पावलं टाकताना दिसतात. या पिल्लांच्या जिवण्यांच्या फुगीर कडा आणि तुरे नसलेली काळपट डोकी या खुणांवरून ती पालकांपासून सहज वेगळी ओळखता येतात..    
              

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)