इतर मराठी नाव : बंड्या धीवर, डुबकन्या, ढीव, लालचाचू.
लांबी : २८ सें.मी.
आकार : साळुंखीपेक्षा मोठा
नदीच्या काठावर असलेल्या शहरातील वसाहतींमध्ये सूर्योदयाच्या वेळी एक ललकारीसारखा स्पष्ट आवाज ऐकू येतो. एकदा ऐकला की कधीही विसरला जाणार नाही असा हा खंड्याचा आवाज दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याच्या आवाजासारखा नसतो. हा परिचित आवाज म्हणजे खंड्या पक्ष्याने एक प्रकारे स्वतःची केलेली जाहिरात असते. मादीपर्यंत तो आवाज पोहोचवून तिला आकर्षित करणं आणि त्याचा इलाखा कोणता आहे, हे परिसरातल्या दुसऱ्या नराला सूचित करणं असे या आवाजाचे दोन अर्थ असतात. शहरातली वाहतूक आणि वर्दळीचे कर्णकटु आवाज सुरू व्हायच्या आधी खंड्या उंच इमारतीच्या सर्वांत टोकाशी असलेल्या टीव्हीच्या अँटेनावर बसून ' किलिलिलि ! ' असा लांबलचक आवाज काढतो. आवाज काढण्यासाठी त्याने गाठलेली वेळ आणि जिथे बसून आवाज काढला जातो त्या उच्चासनामुळे खंड्याला दुहेरी फायदा होतो. कारण आवाज दूरवर पोहोचतो.
 |
खंड्या पक्षी घोरपडीचे पिल्लू खाताना |
सकाळच्या वेळेचं हवेचं माध्यम आवाज सर्वदूर पोहोचवायला मदत करतं . कारण सकाळच्या वेळी हवेची घनता जास्त असते. अशा हवेतून ध्वनिलहरी अधिक वेगाने प्रवास करतात. आवाज करताना खंड्या नदीच्या किंवा त्याच्या अधिवासाच्या दिशेला तोंड करून बसलेला असतो कारण त्याला त्या दिशेला संदेश द्यायचा असतो. ज्या ठिकाणी बसून खंड्या ललकारी देतो ती जागा ठरलेली असते. तो दिवसेंदिवस त्याच जागेवर बसून त्याचं ' गाणं ' गातो. अशा वेळी लालभडक खंजिरी चोच किंचित उघडली जाते. या आवाजवरूनच त्याला हिंदी भाषेत ' किलकिला ' म्हणतात . खंड्याचं इंग्रजी नाव ' किंगफिशर ' असलं तरी त्याच्या मेन्यूकाडाँत ' नाकतोडे,
गवळण किंवा नमस्कार कीटक ( Praying Mantis ),
झुल्लिर ( Cricket ),
घोंगेरा किंवा घुरगुरा ( Mole Cricket ), झुरळ, पाणभुंगेर, शिंगा, विंचू, बेडूकमासे, बेडूक, भेक, पाली, विरोळा आणि गरगर ( Kukri ) यांच्यासारखे साप, पक्ष्यांची पिल्लं आणि फुलटोचासारखे पक्षी , उंदीर अशा कितीतरी प्राण्यांचा समावेश होतो . अर्थातच तो मासेदेखील मारून खातो. हा एक सार्वत्रिक ( Cosmopolitan ) पक्षी आहे. तो पाण्यापासून दूरही दिसतो. शेती आणि परिसर, बागा, उद्यान, फळबाग, विरळ जंगल, जंगलाच्या काठावरचा प्रदेश, गोड्या पाण्याची वेगवेगळी रूपं - ओढे, नाले, पाट, चर, डबकी, पोखरण, डबरे, कुंडं, कालवे, गावतळी, नद्या, सरोवरं, धरणांचे पाणपसारे, खाऱ्या पाण्याची वेगवेगळी रूपं - समुद्रकिनारा, मच्छिमार बंदरं, खारफुटी, ओटे ( मासे वाळत घालायची जागा ) या ठिकाणी खंड्याचे हिरवट - निळ्या रंगाचे पंख झळकतात. उन्हाचा कहर झालेला असताना जंगलातल्या एखाद्या पाणवठ्यावर खंड्या स्वतःला झोकून देतो आणि काही क्षण पाण्यात बुडालेल्या अवस्थेत राहून उसळी घेतो. अशा वेळी तीन ठरावीक आवाज होतात ' चिक् -फच्याक - फडर । पहिला ' चिक् ! ' हा शार्प आवाज पक्ष्याचा स्वतःचा असतो . दुसरा फच्याक ! ' हा पाण्यात पडल्याचा आणि तिसरा ' फडर ! ' हा ओल्या , जड पंखांच्या उघडझापीचा. निरीक्षकाच्या नजरेतसुद्धा नसलेल्या एखाद्या जागेवरून खंड्या स्वतःला झोकून देतो तेव्हा त्याचा आवेश आणि बुचकुळी मारल्यानंतर उडालेलं पाणी यामुळे पाणवठ्यावर उतरलेला शिळ्यासारखा पक्षीसुद्धा घाबरून उडतो. कुठेही आदळआपट न होता चार घमेली पाण्यात बुडी मारणाऱ्या खंड्याचं कालनियोजन अफलातून असतं. अंगावरची भिजवून पक्षी पुन्हा पाणवठ्यापासून दूर जातो आणि एखाद्या झाडावर बसून साफसूफ करतो. या खंड्याची नजर फार जबरदस्त असते. पाणवठ्याच्या परिघातली प्रत्येक हालचाल तो पटकन टिपतो. आपण जर लपणात ( Hide ) बसून फोटोग्राफी करत असलa , तर कॅमेऱ्याच्या लेन्सची तसूभर हालचालसुद्धा त्याला उडवायला पुरेशी असते . पाणवठ्यावर सर्पगरुडासारखा मोठा शिकारी पक्षी आला की, खंड्या ' के - के - के - के - के ! ' असा धोक्याची सूचना देणारा भसाडा आवाज काढतो.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातला एक गोंड आदिवासी एकदा कामाला निघाला होता. नेमका त्याच वेळी एक खंड्या आवाज काढत होता - " किलिलिलि ! ' त्या गोंडाला असं वाटलं की तो आपल्याला विचारतोय - ' किधर ! ' म्हणजे ' कुठे निघालास ? ' कामाला जाताना कुठे निघालास असं विचारतोय याचा त्याला प्रचंड राग आला. त्याने गलोल घेतली आणि अचूक नेम धरून खंड्या संपवला. या आदिवासी पट्ट्यातले लोक आजही ' किधर ? ' हा खंड्याचा आवाज ऐकू आला, तर अपशकुन झाला असं मानतात आणि प्रश्न विचारणाऱ्या खंड्याला ताबडतोब संपवतात. जानेवारी ते ऑगस्ट या काळात खंड्याची वीण होते. खंड्याच्या इतर जातींप्रमाणे नदीच्या काठावरच्या दरडीत किंवा घसरडीत जमिनीला समांतर बीळ खणलं जातं. खाणीत, घाटात, अभयारण्यात किंवा राष्ट्रीय उद्यानांमध्ये रस्ते तयार करण्यासाठी खोदाई करून दगडमाती काढली जाते. अशा ठिकाणी तयार झालेल्या धीमध्ये ( मातीच्या भिंतीमध्ये ) खंड्या हटकून घरटं करतो. घरट्याच्या बोगद्याची लांबी साधारण १ मीटर असते. बिळाच्या टोकाला खोदून तयार केलेल्या अंड्याच्या कोठीत ४ ते ७ पांढरी शुभ्र अंडी घातली जातात. अंडी उबवण्यापासून पिल्लांची देखभाल करण्यापर्यंतची सर्व कामं नर आणि मादी मिळून करतात.
Comments
Post a Comment