इतर मराठी नावं : घोगड, घोघो पिंजरा, पिंजरला, पिंजल
इंग्रजी नाव : Spotted Owlet (स्पॉटेड आऊलेट)
शास्त्रीय नाव : Athene brama
लांबी : २१ सें.मी.
आकार : साधारण साळुंखीएवढा
राखट - तपकिरी अंगावर पांढरे ठिपके असणारं हे एक छोटं घुबड आहे. घुबडांना दिवाभीत किंवा दिवांध असंही म्हणतात. पिंगळ्याला साधारण सपाट चेहऱ्यावर समोरच्या बाजूला खूप मोठे, वाटोळे डोळे असतात. याचा मुख्य फायदा असा की त्यामुळे त्याला अंतराचं ज्ञान अचूक होतं. दुसऱ्या कोणत्याही पक्ष्यापेक्षा घुबडाची व्दिनेत्री दृष्टी ( Binocular Vision ) अधिक व्यापक असते. जिवंत भक्ष्य पकडत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने व्दिनेत्री दृष्टीचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. बाजूचं किंवा मागचं बघण्यासाठी घुबडं गर्रकन डोकं वळवतात. खेड्यापाड्यांमधीलशेत - शिवारं, जुनी झाडं, पडक्या इमारती, नदीकाठची बाभळबनं, शहरांमधील बागा, उद्यानं आणि डोंगर-टेकड्यांवरील विरळ झाडी या पिंगळ्यांच्या राहण्याच्या जागा, पिंगळे जोडीने राहतात किंवा ७-८ जणांचा कुटुंबथवा काही वेळेस एकत्र राहताना दिसतो. टोळ, भुंगे, सरडे, उंदीर, चिचुंद्रा हे त्यांचं आवडीचं खाद्य. त्यामुळे पिंगळा शेतीचा संरक्षक आहे. साधारण नोव्हेंबर ते एप्रिल हा या पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाच्या ढोलीत किंवा आडबाजूला असलेल्या बाभळीच्या फांदीवर एकमेकांना खेटून बसलेले, पेंगुळलेले पिंगळे दिवसासुद्धा पाहायला मिळतात, आपण त्यांना पाहिलं आहे हे त्यांना कळलं की, ते ' उठाबशा ' काढतात आणि गरगरीत डोळे वटारून आपल्याकडे पाहू लागतात. पिंगळ्यांच्या या हालचाली मोठ्या मजेदार असतात.
जसजशी शहरं पसरत आहेत तसतसे प्रचंड विस्तार असलेले पुराणवृक्ष तोडले जात आहेत. पिंगळ्यांसारख्या उपयुक्त पक्ष्याचे आसरे नष्ट होत आहेत. त्यामुळे कधी कधी शहरवस्त्यांमध्ये कावळ्यांचा ससेमिरा लागलेले, घाबरेघुबरे पिंगळे बघायला मिळतात. असा एखादा पिंगळा जर चुकून दिवसाउजेडी घराच्या आश्रयाला आला, तर त्याला खोलीत बंद करून ठेवावं. मुख्य म्हणजे त्याला काहीही खायला घालू नये किंवा एकसारखं बघू नये, रात्र झाली की खोलीची दारं - खिडक्या उघडाव्यात. तो आपोआप उडून जाईल.
हा पक्षी वाचवायचा असेल तर निर्जन जागा आणि जुनी झार्ड , जशीच्या तशी ठेवली पाहिजेत. एखादं जुनं झाड तोडून मिळणाऱ्या, कापरासारख्या उडून जाणाऱ्या पैशापेक्षा त्याच झाडाच्या ढोलीत राहणारी घुबडाची जोडी शेतांमधले उंदीर खाऊन आपल्याला कितीतरी वर्ष अधिक उत्पन्न मिळवून देणारी सेवा पुरवते हे निदान आतातरी शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे.
Comments
Post a Comment