दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्थायिक पक्षी आहे. मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलेला

चश्मेवाला Oriental White-eye (Zosterops palpebrosus)

दुसरं मराठी नाव : चाळिशीवाला
इंग्रजी नाव : Oriental White - eye (ओरिएंटल व्हाइट - आय) 
शास्त्रीय नाव : Zosterops palpebrosus (झूस्टेरॉप्स पॅल्पेब्रोसस) 
लांबी : १० सें.मी. 
आकार : चिमणीपेक्षा लहान 



          काहीसं विचित्र नाव असलेला हा छोटासा पक्षी बागा, उद्यानं, फळबागा, आमराया, उपवनं, पानझडीची जंगलं आणि खारफुटींमध्ये आढळतो. चार झाडांची निगा राखून घराशेजारी फुलवलेल्या छोट्या बागेतही तो हजेरी लावतो. राखी वल्गुली, शिंजीर, जांभळा शिंजीर, सुभग, तुरेवाला वल्गुली, राखी वटवट्या, शिंपी, ब्राउन चिफचॅफ या चिंट्यापिंट्यांच्या मंडळाचा सभासद असलेला चश्मेवाला जरा लांब असेल तर दुर्बिणीशिवाय ओळखणं अवघड आहे. हिरव्या - पिवळ्या रंगाच्या या पक्ष्याच्या डोळ्यांभोवती चश्म्यासारखी दिसणारी पांढरी कडी असतात. त्यामुळे एकदा का त्याचा ' चश्मा ' दिसला की ओळख पक्की झाली असं समजावं. जवळजवळ सगळं आयुष्य झाडावर काढणारा चश्मेवाला कधीही एकटा दिसत नाही. 
          हा मिश्राहारी पक्षी लहानसहान किडे, फुलांतला मधुरस आणि फळांवर गुजराण करतो. या पक्ष्याची वीण अर्धा उन्हाळा आणि अर्धा पावसाळा, म्हणजे एप्रिल ते जुलैच्या दरम्यान होते. चैत्रपालवीने झार्ड भरली की त्याचं घरटं साकारतं. घरटं काळजीपूर्वक डहाळीत लपवलेलं असतं. अंडी उबवण्याचं आणि पिल्लांना भरवण्याचं काम नर आणि मादी मिळून करतात. सुरुवातीच्या मऊ परांना ( Down Feathers ) हटवून पिसांचा पहिला कोट चढला की पिल्लांना ' चश्मा ' लागतो !  
          हा पक्षी आवाजावरून ओळखायचा असेल तर कान चांगलाच तयार असावा लागतो. चश्मेवाल्याचा ' टी - टी - टी - टी - टीं ! ' असा काहीसा अनुनासिक किंवा ' तिर - तिर - तिर तिर ! ' असा नाजूक आवाज इतर पक्ष्यांच्या किलबिलाटात मिसळून जातो. हा आवाज पक्षी परस्परांच्या संपर्कात राहण्यासाठी काढतात. विणीच्या हंगामात नर छोटंसं गोड गाणं गातो. डोंगरउतारावर उगवणाऱ्या धायटीच्या झुडपाला उन्हाळ्यात दुसरा बहार येतो. नारिंगी रंगाच्या फुलांनी धायटी चारचौघांमध्ये उठून दिसते. चुकून धक्का लागला तरी धायटीची नलिकांसारखी फुलं मधुरसाची शिंपण करतात. चिंट्यापिंट्या पक्ष्यांच्या मंडळाला फुलांवर आलेल्या धायटीची लगेच बातमी लागते. जांभळा शिंजीर आणि चश्मेवाला हे दोन्ही पक्षी घायटीवर अपॉइंटमेंट घेतल्यासारखे बघता येतात. पानझडीच्या रानात चैत्राच्या सुरुवातीलाच ओढे, ओहोळ सुकून कोरडेठाक पडता . पण झऱ्यांना, झिरप्यांना पाणी राहतं. एखाद्या स्थानिक गावकऱ्याच्या मदतीने असा झरा शोधावा, त्याच्या आसपास लपून बसावं . आपल्या अस्तित्वाची कोणतीही खूण बाहेर न ठेवता कासवासारखे हातपाय आवरून आत बसावं. उन्हाची तिरीप वाढली की नाना प्रकारचे पक्षी नाना तन्हांनी पाण्यावर उतरतात. अशा वेळी चश्मेवाल्यांचा थवाही पाण्यावर येतो. कोणताही पक्षी एकटादुकटा थेट पाण्यावर येत नाही, परस्परांची सोबत त्यांना खूप महत्त्वाची असते. पाणवठ्यावर बुलबुल, कोतवाल असे पक्षी असताना चश्मेवाल्यांना बळ येतं. कोणत्याही क्षणी उडायच्या तयारीत ते पाणवठ्याच्या कडेला उतरतात. दुसऱ्या जातीचा कोणताही पक्षी घाबरून केकटला की काय घडतंय हे बघायच्या भानगडीत न पडता हे उडतात आणि एखाद्या बांबूच्या रांजीच्या आसऱ्याला येतात. चश्मेवाल्यांच्या अशाच एका विखुरलेल्या थव्यातला एक पक्षी माझ्यासमोर एका चिमणबाजाने ( Besra - एक शिकारी पक्षी ) उडवला. सुमारे १० ग्रॅम वजनाच्या चश्मेवाल्याची एवढ्या झोकात शिकार करून चिमणबाजाला गेला बाजार किती ग्रॅम मांस मिळालं असेल, हा प्रश्न काही दिवस माझ्या डोक्यात होता. कदाचित शिकारीची प्रैक्टिस करण्यासाठी बेसऱ्याने चश्मेवाल्यावर झडप मारली असावी, अशी मी स्वतःची समजूत करून घेतली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

पिंगळा Spotted Owlet (Athene brama)