इतर मराठी नावं : बहिरा पोपट, तेलंगी, पतेरी, पातूर, पतरिंगा, पानरागो, कंगन
सध्याचं इंग्रजी नाव : Green Bee-eater ( ग्रीन बी-ईटर )
आधीचं इंग्रजी नाव : Small Green Bee-eater ( स्मॉल ग्रीन बी-ईटर )
शास्त्रीय नाव : Merops orientalis ( मेरॉप्स ओरिएंटॅलिस )
लांबी : १६ ते १८ सें.मी.
आकार : चिमणीएवढा
 |
Add caption
|
एखादया बाभळीच्या झाडाच्या फांदीवरून हवेत झेप घेणारा, उडणाऱ्या किड्याच्या हालचालीबरहुकूम उलटसुलट गिरक्या घेणारा आणि किडा पकडताच पंख पसरून संथपणे तरंगत पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसणारा वेडा राघू रानोमाळ फिरणाऱ्या पोरांना चांगलाच माहीत असतो. त्याला ते ' भैरा पोपट ' या नावाने ओळखतात. शेतीवाडी, चराऊमाळरानं, विरळ जंगलं ही ते आढळण्याची मुख्य ठिकाणं, हिरव्या रंगाच्या या सुंदर पक्ष्याच्या शेपटीमधली दोनच पिसं जास्त लांब असतात. या पिसांचा निम्मा भाग नाजूक तारांसारखा दिसतो. हे पक्षी जोडीने किंवा लहान थव्यांनी विजेच्या तारा, कुंपणावर, झाडाच्या फांद्यांवर बसून आपली शिकार टिपण्यात दंग असतात. हवेत झेपावत एखादा किडा पकडला की पुन्हा तारेवर येऊन त्याला मारून खात बसायचं आणि नव्या शिकारीची वाट पाहायची, अशी या पक्ष्याची खोड असते. मातीत अंघोळ करणं हे वेड्या राघूला फार आवडतं त्यामुळे चावणाऱ्या आणि रक्त पिणाऱ्या परजीवींपासून त्याची सुटका होते.
मधमाश्या पाळण्याचा धंदा करणाऱ्या लोकांचा हा एक नंबरचा शत्रू आहे. कारण हा पक्षी मधमाश्या मारण्यात पटाईत आहे. संध्याकाळ झाली की दिवसभर किड्यामकोड्यांच्या शिकारींसाठी बाहेर पडलेले वेडे राघू एखाद्या निवाऱ्याच्या झाडावर एकत्र येतात. अशा वेळी ' टीर - टीर - टीर - टीर ! ' असा किणकिणता आवाज करत हे पक्षी रात्रभर बसण्यासाठी उपयुक्त अशा जागांवरून गोंधळ करतात. हे माहीत असलेला शिक्यासारखा एखादा शिकारी पक्षी अंधार जास्त वाढला की बरोबर डाव साधतो आणि एखादा तरी पक्षी झडपतो.

दुसऱ्या दिवशी आसपासच्या एखाद्या झाडाखाली वेड्या राघूची गवतासारखी हिरवी पिसं पडलेली दिसतात. हा पक्षी फेब्रुवारी ते जूनच्या दरम्यान घरटं करतो. त्याचं घरटं एखाद्या टेकडीच्या उतारावर असतं, तीक्ष्ण चोचीचा उपयोग करून पक्षी बीळ खणतो. बिळाची लांबी १९.७ इंचांपासून (अर्धा मीटर) ७८.८ इंचांपर्यंत (दोन मीटर) असू शकते. बिळाच्या टोकाला ४ ते ७ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी घातली जातात. अंधारात दिसावीत म्हणून अंडी पांढऱ्या रंगाची असतात. थंडीच्या दिवसांत एखाद्या झाडाच्या किंवा झुडपाच्या बाहेर आलेल्या आडव्या किंवा तिरक्या फांदीवर वेडे राघू बैठका जमवतात आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात पाठी शेकत बसतात. अशा वेळी एखादं फूल फुलावं तशी पक्षी आपल्या पाठीवरची पिसं फुलवतो. त्यामुळे आतल्या थरापर्यंत ऊन जाऊ शकतं. फांदीवर बसलेल्या दोन पक्ष्यांमध्ये अजिबात जागा सोडली जात नाही. थंडी वाजू नये म्हणून पक्षी परस्परांना अगदी चिकटून बसतात. अशा वेळी त्यांची संख्या ३-४ पासून १५-१६ पर्यंत असू शकते. हे दृश्य पाहून जणू काही हिरव्या रंगाच्या जिवंत फुलांचा हारच कुणीतरी झाडावर माळलाय असं वाटतं. मधूनच हारातलं एखादं ' फूल ' सुटतं आणि हवेत एखादी वेलांटी काढावी तशी मजेदार गिरकी घेऊन पुन्हा आपली रिकामी जागा भरून काढतं.
Comments
Post a Comment