लांबी : ४१ सें . मी .
भलीमोठी भरभक्कम चोच असलेला आणि उग्र दिसणारा डोमकावळा किंवा डोंबकावळा म्हणजे मला तर छोट्या शिकारी पक्ष्याचाच एक अवतार वाटतो . बाकदार चोच , भक्कम पंजे , धारदार नख्या आणि झपाटा मारणारे पंख या जमेच्या बाजू नसल्या तरी हा पक्षी त्याच्या अंगात असलेलं धाडस , उभयाहार आणि बेरकीपणा या गुणांवर टिकून आहे . ' डोंब ' या शब्दाचा अर्थ स्मशानात , मसणवटीत चाकरी करणारा माणूस . डोंबाप्रमाणेच कावळ्याची ही जात स्मशानात दिसते म्हणून डोमकावळा हे नाव . गावकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा हा डोमकावळा जणू डांबराच्या पिंपात बुडवून काढला
आहे असं वाटावं इतका काळाकिट्ट असतो . आजकाल शहरभागात राखाडी मानेचा गावकावळा आणि हा काळा कुळकुळीत डोमकावळा एकत्र दिसतात . एरवी हा पक्षी शहरांच्या बाहेर खेड्यापाड्यांमध्ये राहणं पसंत करतो . जंगलं आक्रसली तसा डोमकावळ्याने शहरांकडे आपला मोर्चा वळवला .
कोणत्याही प्रकारच्या जंगलातली मनुष्यवस्ती , समुद्रकिनाऱ्यावरची माशांची वाळवणं , खाटीकखाने , मासळी बाजार , मटन मार्केट , हॉटेलांमधला उष्ट्या - खरकट्याचा मलबा वाहून नेणाऱ्या गाड्या , गावाबाहेरचे उकिरडे , आधुनिक कचरापेट्या , कचरा डेपो आणि रस्ते हे डोमकावळ्याचे ठिय्ये . भररस्त्यात मरून पडलेल्या लठ्ठ घुशीवर समजा योगायोगाने हे दोन्ही जातींचे कावळे टपकलेच तर पहिली चोच मारण्याचा मान डोमकावळ्याकडे जातो . प्रसंगी शिक्र्यासारख्या शिकारी पक्ष्यालासुद्धा घोळात घेणाऱ्या ( धमकावणाऱ्या ) डोमकावळ्यापासून गावकावळा दूर राहतो . डोंगरदऱ्यांमध्ये भटकणाऱ्या ट्रेकर मंडळींना किंवा पर्यटकांना डोमकावळा बरोबर शोधून काढतो . अशा टोळक्यांच्या डोक्यांवरून दोन चार घिरट्या घालतो . मग ‘ आ - आ - आ - आ ! ' असा बातमीवजा पुकारा करत निघून जातो . थोड्या वेळाने दुसऱ्या कावळ्याला घेऊन येतो . चार टाळकी एकत्र आली की , ती काहीही झालं तरी कुठेतरी खाली बसणारच . एकदा खाली बसली की , काहीतरी खाणारच आणि खाल्लं की , खाली सांडणारच हे अनुभवावरून कावळ्याला पक्कं माहीत असतं . मग आसपासच्या एखाद्या उंच झाडावर जोडीतले कावळे वाट बघत बसतात . माना काढून वाकून वाकून बघतात . शेपट्या दाबून ' आ - आ - आ - आ ! ' असा खर्जातला आवाज काढतात . मधूनच इकडून तिकडे उडत जागा बदलतात . इकडे डोंगरभटक्यांचं वनभोजन उरकलं आणि ते पुढे सरकले की , अजिबात वेळ वाया न घालवता कावळे शिल्लक अन्नपदार्थ फस्त करतात . खेड्यापाड्यात एखादं ढोर मेल्यानंतर त्याची खाल काढून मढं उघड्यावर टाकून दिलं जातं . अशा वेळी सफाईकाम करणाऱ्या पशुपक्ष्यांच्या ( गिधाडांच्या , कुत्र्यांच्या ) पलटणीत डोमकावळाही असतो . तोसुद्धा मेलेल्या जितराबाची विल्हेवाट लावण्याच्या कामात सहभागी होतो . अर्थातच गिधाडांच्या आणि कुत्र्यांच्या तुलनेत याचा वाटा अगदी लहान असतो . परंतु हल्ली रोगग्रस्त , अशक्त , भाकड जनावरं खाटीकखान्यांकडे नेण्याच्या पद्धतीमुळे डोमकावळ्याचं खाद्य कमी होऊ लागलं आहे . त्याची संख्या कमी होत आहे . आपल्या देशात पशुपक्ष्यांचा चांगला वावर असलेल्या कोणत्याही प्रदेशातून जाणाऱ्या डांबरी रस्त्यांवर दरवर्षी लक्षावधी पशुपक्षी वाहनांखाली चिरडून मरतात . ढालकीटक , बेडूक , भेक , पाली , सरडे , सापसुरळ्या , कासवं , साप , नाना प्रकारचे पक्षी , उंदीर , खारी , ससे , रानमांजर , मसण्याऊद , जवादी मांजर , कोल्हे , तरस , बिबट्या . . . निसर्गाने सफाईचं काम दिलेल्या अनेक जिवांचं हे खाणं असतं . कुणाची न्याहरी तर कुणाचं भोजन . असाच एखादा मेलेला प्राणी खाण्यासाठी डोमकावळा तांबडं फुटताच रस्त्यावर उतरतो . मान तिरकी करून , चोच रस्त्याला समांतर धरून अगदी चपटा झालेल्या प्राण्याच्या मांसाचे लहान लहान तुकडे गोळा करतो आणि खातो . एखादा मेलेला बेडूक बऱ्यापैकी सुस्थितीत असेल , तर तो आख्खाच्या आख्खा उचलून आसपासच्या झाडावर जातो .
दुपारच्या शांत वेळी डोमकावळा एखाद्या झाडाच्या आडव्या फांदीवर बैठक जमवतो । आणि मजेदार आवाज काढतो . या आवाजांचा नेमका अर्थ सांगणं अवघड आहे . त्यातले काही आवाज स्वगत म्हटल्यासारखे असतात , तर काही चक्क गोडअसतात . एक वाळवंटी ।
प्रदेश सोडला , तर हा सर्वसंचारी पक्षी सर्व प्रकारच्या अधिवासांमध्ये आढळतो . स्वतः । शिकारही करतो . चिमणी , बुलबुल , पारवा , कोंबडी या पक्ष्यांची पिल्लं मारण्यात पटाईत असलेल्या डोमकावळ्याची नजर दिवसाचा आसरा सोडून बाहेर पडलेल्या नकट्या फळवाघळाकडेही ( Short - nosed Fruit Bat ) जाते . गोंधळलेलं वाघूळ कोणताही आसरा मिळायच्या आत डोमकावळ्याच्या कडक चोचीच्या तडाख्यात सापडतं . डोमकावळ्याची आणखी एक सवय म्हणजे तो गावकावळ्याचं खाद्य त्याच्याकडून हिसकावून घेतो . डिसेंबरपासून एप्रिलपर्यंतच्या काळात डोमकावळ्याची वीण होते . तो ।
गावकावळ्यासारखी स्वतःची हाउसिंग कॉलनी बनवत नाही . एकटा , स्वतंत्रपणे घरटं करतो . घरटं काड्याकाटक्यांनी बनवलेलं असतं . घरट्यासाठी झाडाची एखादी सुकलेली काडी तोडताना पक्षी काडीला लटकतो आणि स्वतःचं वजन वापरून ती तोडतो . गगनजाई , नाताळ वृक्ष , कडुनिंब किंवा वडासारख्या झाडावर उंच ठिकाणी तो घरटं करतो . घरटं बांधणं , अंडी उबवणं आणि पिल्लांना वाढवणं या जबाबदाऱ्या नर आणि मादी दोघं मिळून वाटून घेतात . डोमकावळ्याच्या पिल्लांची तोंडं आतून लालभडक असतात . चोची मिटलेल्या अवस्थेतही ही पिल्लं ओळखता येतात . कारण त्यांच्या जिवण्या रुंद आणि फुगीर असतात . परभृत कोकिळा डोमकावळ्याच्याही घरट्यात आपलं अंड घालते . त्यामुळे डोमकावळा । त्याच्या घरट्याच्या आसपास घोटाळणाऱ्या कोकीळ - कोकिळेला हाकलून लावतो आणि । त्याचा ' मामा ' झाला , तर कोकिळेच्या जहांबाज पिल्लाला भरवतानाही बघायला मिळतो .
Comments
Post a Comment