दयाळ

Image
इतर मराठी नावं : डोमिंगा, सुईणबुड्डी, खोडाकुशी, वट्टी, कोडामल्ली  सध्याचं इंग्रजी नाव : Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅगपाय रॉबिन)  आधीची इंग्रजी नावं : Dayal (दयाल), Magpie Robin (मॅगपाय रॉबिन)  शास्त्रीय नाव : Copsychus saularis (कॉपसिकस सॉलॅरिस)  लांबी : २३ सें.मी.  आकार : बुलबुलापेक्षा मोठा            सरसरत उंच गेलेल्या गगनजाईच्या हिरव्या मनोऱ्याच्या टोकाशी बसून 'उस्ताद दयाल खाँ' गाणं गात असतात. एका मागून एक गोड सुरांच्या माळाच त्यांच्या कंठातून बाहेर पडत असतात. या गवयाची गाण्याची बैठक पक्की ठरलेली असते. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यासारखं त्याला पुन्हा पुन्हा पाहता येतं. पक्ष्यांमधला सुप्रसिद्ध गायक श्याम (White - rumped Shama) , a (Indian Robin) tror ferfert (Black Redstart) यांच्या फॅमिलीतल्या दयाळाची ओळख पटवणं अगदी सोपं आहे. नर काळाकुळकुळीत आणि पोटाशी पांढरा शुभ्र, तर मादी राखाडी रंगाची असते. परसबागा, उद्यानं, फळबागा, आमराया, गावखेड्यांच्या आसपासचा झाडझाडोरा आणि पानगळीचं जंगल हा त्याचा अधिवास आहे. दयाळ हा एक सहजपणे दिसणारा स्...

पक्ष्यांची निसर्गातील भूमिका



पिसं असलेला द्विपाद म्हणजे पक्षी. द्विपाद म्हणजे दोन पायांचा. जगात आजतागायत पक्ष्यांच्या सुमारे ८,६०० जातींची नोंद झाली आहे. जर उपजातींचा किंवा भौगोलिक वंशाचा (Sub-species or Geographical Races) विचार केला तर ही संख्या जवळजवळ ३० हजार एवढी वाढते. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे सुमारे १,२५०
जातींची नोंद झाली आहे. उपजाती अंतर्भूत करायच्या ठरल्या तर एकूण संख्या जवळजवळ २,४०० पर्यंत जाईल. तर महाराष्ट्रात जवळजवळ ५४० जाती-उपजातींची ओळख शास्त्राला पटली आहे. अर्थातच यामध्ये बाहेरच्या देशांमधून आपल्याकडे काही काळापुरते येणाऱ्या स्थलांतरी (Migratory) पक्ष्यांचा समावेशही केलेला आहे.
सर्वसामान्य माणसाला पक्ष्यांचं आकाशात उडणं, त्यांचे विविध रंग आणि तऱ्हेत्हेचे आवाज या गोष्टी भावतात तर पक्षिशास्त्रज्ञ त्यांच्याकडे पर्यावरणाचे सूचक म्हणून पाहतो. रॉजर टोरी पीटरसन यांच्या मते पक्षी म्हणजे पारिस्थितीकीचा (Ecology) लिटमस कागद आहेत. पर्यावरणातील बदलांना ते चटकन प्रतिसाद देतात. परिसंस्थेत (Ecosystem) बिघाड असेल तर ते संदेश पाठवतात. आपल्या भारतीय परिस्थितीतलं एक उदाहरण घेऊ. तणमोर (Lesser Florican) या नावाचा एक पक्षी उंच गवताचा आणि अधूनमधून झुडपं असलेला अधिवास पसंत करतो. जर अभ्यासांती तणमोरांची एकूण संख्या कमी झालेली आढळली तर त्याचं कारण अशा गवताळ निवासस्थानांचं प्रमाण कमी झालेलं आहे, हे असू शकतं. हेच सूत्र घेऊन आपल्या जंगलांची, पाणथळींची सद्यःस्थिती काय आहे हे पडताळून पाहता येईल. माणसाला आणि पर्यावरणाला पक्ष्यांचे अनेक उपयोग
आहेत. पक्ष्यांच्या काही कर्तृत्वांचा आपण एक धावता आढावा घेऊ.

कीटकांवर नियंत्रण -:

एका कीटकशास्त्रज्ञाने असं म्हटलं आहे की, या जगात जर पक्षीच नसते तर पृथ्वीचं वाळवंट झालं असतं. हे खरं आहे. कीटकांची हाव, त्यांची जन्मजात भूक हे सगळं आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. एकट्या भारतात जवळजवळ ३० हजार कीटकजातींची रीतसर नोंद करण्यात आली आहे. आणखी कितीतरी जाती सापडू शकतील. जगभरात कोलेरॅडो पोटॅटो बीटल या नावाच्या पानढालकीटकाच्या २० हजार जाती आहेत. जर या कीटकाची जोडी सगळ्या प्रकारच्या धोक्यांपासून, नियंत्रणांपासून सुखरूप अशी वाढवली तर एका हंगामात
ती सहा कोटी एवढी होईल! एक अळी तिच्या एकूण वजनाच्या दुप्पट पानं फक्त एका दिवसात खाते. परवाच आपल्या राजस्थानात टोळधाड आल्याची बातमी वाचली. हे टोळ (Locust) जे हिरवं दिसेल, ते खाऊन टाकतात. टोळाची मादी जमिनीखाली 'कॅपसूल' करून त्यात अंडी घालते. एका 'कॅपसूल'मध्ये (म्हणजे मातीची, लंबगोलाकार कुपी किंवा डबी) सुमारे १०० अंडी असतात. अशा अनेक 'कॅपसूल्स'मध्ये एकाच मादीकडून अंडी
घातली जातात. दक्षिण आफ्रिकेतील सुमारे १३०० हेक्टर एवढ्या एका शेतात फक्त एकदा खोदाई केल्यानंतर १४ टन एवढी टोळांची अंडी गोळा करण्यात आली. त्या अंड्यांपासून सुमारे १२५ कोटी
एवढ्या टोळांची निर्मिती झाली असती. मुग्ध बलाक (White Stork) हा एक प्रसिद्ध टोळनाशक पक्षी आहे. आपल्या देशात सायबेरियातून स्थलांतर करून येणारा भोरडी (Rosy Pastor) हा पक्षी त्याच्या पिल्लांना मुख्यत्वेकरून टोळच खायला घालतो. पुष्कळसे पक्षी अंड्यांमधून बाहेर आल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या वजनापेक्षा जास्त अन्न एका दिवसात खातात. एका जर्मन पक्षिशास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार टिट या
चिमणीएवढ्या पक्ष्याची एक जोडी आणि त्याची प्रजा एका वर्षात कमीत कमी १२ कोटी किड्यांची अंडी किंवा १ लाख ५० हजार अळ्या आणि पीलव फस्त करते. मी स्वतः सुबाभळीच्या एका झाडावर राखी वटवट्या नावाचा एक पक्षी एका मिनिटात कमीत कमी पन्नास वेळा टोचा मारून हिरवे तुडतुडे खाताना बघितला होता. राखी वटवट्यासारख्या इतर छोट्या पक्ष्यांनी कीटकांची लागण झालेल्या या झाडावर आपली पोटपूजा केली नसती तर
कदाचित ते झाडच जिवंत राहिलं नसतं. पक्षी किती मोठ्या प्रमाणात कीटकांचा नाश करून निसर्गाचं संतुलन राखतात हे तुमच्या लक्षात आलं असेल.
(Blue chick bee eater eating dragonfly) photo by rushikesh deshmukh
(Golden oriol eating butterfly insect) photo by rushikesh deshmukh

उपद्रवकारक प्राण्यांचा नाश -:

घुबड, ससाणे, श्येन आणि इतर कित्येक शिकारी पक्षी घरातल्या आणि शेतातल्या उंदरांवर नियंत्रण ठेवतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नियंत्रण नैसर्गिक असतं. आपण विविध प्रकारच्या विषारी पदार्थांचा वापर करून आणि त्यांच्या निर्मितीत प्रचंड पैसा खर्च करून उंदरांसारखे प्राणी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते मरत असले तरी तो विषार अन्नसाखळीतून नष्ट होत नाही. कारण विष घालून मारलेला उंदीरही पुढे कोणीतरी खातच असतं. त्यामुळे मूळ प्रश्न सुटल्यासारखा वाटला तरी त्याचे दुष्परिणाम वाढतच राहतात. आपल्या शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान करून हे उंदीरमामा थांबत नाहीत, तर माणसाला घातक अशा रोगांचा प्रसार करतात. एक उंदराची जोडी जर वर्षभर पाळली आणि तिच्यापासून निर्माण झालेली पिलावळ जर कोणत्याही बाह्य धोक्यांपासून सुरक्षित ठेवली तर वर्षाच्या शेवटी त्यांची संख्या सुमारे ९०० एवढी होईल! (यामध्ये दोन उंदीर व त्यांची प्रजा व त्यांची प्रजा असा हिशेब आहे.) आपल्याकडे अवघ्या महाराष्ट्रात गव्हाणी घुबड नावाचा एक पक्षी मनुष्यवस्तीतही राहतो. त्याची आणि धान्यकोठारामधून बाहेर पडणाऱ्या उंदरांची वेळ एकच. गव्हाणी घुबड हा एक अत्यंत उपयुक्त पक्षी असून त्याचं मुख्य अन्न उंदीर आहे. मग कल्पना करा की एक उंदराची जोडी जर गव्हाणी घुबडाने आठवडाभरात खाल्ली तर अप्रत्यक्षरीत्या पुढे जन्मणाऱ्या किती उंदरांचा नाश झालेला असेल? त्यामुळे केवढंतरी आर्थिक नुकसान वाचू शकेल. कितीतरी भुकेल्यांना अन्न मिळू शकेल. भारतातील एकूण
धान्य उत्पादनापैकी सुमारे १५ ते १८ टक्के धान्य उंदरांकडून दरवर्षी फस्त होतं. या अन्नावर
१० कोटी लोकांची पोटं भरू शकतील.
(Short toed snake eagle eating snake) photo by ganesh dhumal

निसर्गाचे सफाईकार -:

एखादी म्हैस मेली आणि ती तशीच टाकून दिली तर काय होईल? ती कुजेल आणि सगळीकडे दुर्गंधी सुटेल. कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली की हजारो जीवजंतू जन्म घेतील. ते पाण्यात जातील, मातीत शिरतील, वनस्पतींवर हल्ले करतील, हवेत पसरतील. पण निसर्गप्रक्रियेत मेलेली म्हैस अथवा कुठलाही प्राणी तसाच पडून राहत नाही. तिथे कोल्हा, कुत्री, तरसं येतात आणि आपलं पोट भरतात. या प्राण्यांबरोबर कावळे, घारी, सुपर्ण किंवा भुऱ्या गरुड (Tawny Eagle), ससाणे आणि कितीतरी प्रकारची गिधाडं तिथे हा हा म्हणता जमतात आणि अक्षरशः काही मिनिटांच्या अवधीतच तिथे म्हशीचा सांगाडा दिसू लागतो. दष्काळात शेकडो जनावरं भुकेपोटी तडफडून मरतात आणि तशीच फेकून दिली जातात. इथे गिधाडांची भूमिका फार महत्त्वाची असते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की माणूस कधी गिधाडांचा विचार करत नाही. त्यांच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची तर गोष्टच सोडा.
(Peregrine falcon) photo by rushikesh deshmukh

 बीजप्रसार -:

 काळटोप हळद्या (Black-hooded Oriole) हा पक्षी केवळ तीन मिनिटांत । घाणेरीची ७७ फळं खाताना निरीक्षकांनी पाहिला आहे. पक्ष्यांच्या पोटातील पाचकरसांचा परिणाम न होता फळांच्या बिया पचनमार्गातून पुढे सरकत शेवटी त्याच्या विष्ठेतून बाहेर पडतात. माणसाने लावलेल्या झाडांपेक्षा त्या चांगल्या रुजतात. अशाच प्रकारे संपूर्ण भारतात घाणेरी किंवा टणटणी या मूळ मेक्सिकन वनस्पतीचा प्रसार होण्यात बुलबुल या पक्ष्याचा फार मोठा वाटा आहे, हे आता सिद्ध झालं आहे. किंबहुना अशा कितीतरी वनस्पती
पक्ष्यांमुळे पसरत असतात. पक्ष्यांचा मोठा वाटा असलेल्या या निसर्गनिर्मित झाडोऱ्याचं मला कौतुक वाटतं.

सागरी पक्ष्यांची विष्ठा -: 

पाणकावळे, पाणकोळी आणि गॅनेट्ससारख्या सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून (Guano) उत्तम खत तयार होतं. पेरू या देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर ठरावीक दिवसांत हजारो पाणपक्षी जमा होतात. हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विष्ठेचं संकलन केलं जातं. परंतु अशा प्रकारच्या प्रयोगाची शक्यता भारतात पडताळून पाहिली गेलेली नाही.

परागीभवन करणारे मध्यस्थ -:

जेव्हा एखादा शिंजीर किंवा चश्मेवाला हा पक्षी एखाद्या धायटीच्या केशरी रंगाच्याफुलातला मधुरस पितो तेव्हा त्याच्या कपाळाचा किंवा गळ्याचा भाग पंकेसराला(Anther) लागतो. अशा वेळी परिपक्व झालेल्या परागकणांची (Pollen) पावडरत्याच्या पिसांना चिकटते. दुसऱ्या फुलातील मकरंद पिताना हे परागकण पक्षी फुलाच्या स्त्रीकेसरापर्यंत (Stigma) वाहून नेतो. परागकण स्त्रीकेसरावर पडले की फलन होतं. बी तयार होते. परागीभवन करून वृक्षांच्या सशक्त पिढ्यांची परंपरा चालू ठेवण्याचं काम पक्षी
करतात. पर्यावरणासाठी पक्षी जी काही महत्त्वाची कामं करतात त्यांचा विचार आपण केला. पण त्याहीपलीकडे पक्षी हे आपल्यासाठी निर्व्याज आनंदाचा आणि अप्रतिम सौंदर्याचा ठेवा आहेत. फक्त एकच कल्पना करा की, पक्षी नसलेलं आभाळ कसं असेल?

Comments

Popular posts from this blog

साळुंकी Common Myna (Acridotheres tristis)

जांभळा शिंजीर Purple Sunbird (Nectarinia asiatica)

FISH DIVERSITY IN NIRA RIVER